Pune : कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे

पुणे : पालिकेतील अतिक्रमण व बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम स्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. तसेच, या मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही देण्यात आले आहे.
या दोन्ही विभागांत अपुरे मनुष्य बळ असल्याने अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांची नोंद पुणे महानगरपालिकेकडे नसल्याने त्यांना कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यातच अनेकजण बऱ्याच वर्षांपासून हेच काम करीत असल्याने त्यांना आता इतर ठिकाणी कामही मिळणे कठीण आहे.
ही बाब लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेतील अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात कायमस्वरूपी पद्धतीने पुणे मपालिकेमध्ये सामावून घेण्यात यावे, असे आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




