Rohit Arya Pune Connection: मुंबईत पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेला रोहित आर्य पुण्यात उपोषणादरम्यान झाला होता बेशुद्ध

पुणे – मुंबईतील पवई परिसरात निवड चाचणीसाठी आलेल्या १७ मुलांना ओलीस ठेवल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेला रोहित आर्य हा तरुण गेल्या वर्षी पुण्यात उपोषणाच्या आंदोलनात सहभागी झाला होता. या आंदोलनादरम्यान त्याला अचानक फिट आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आर्य स्वतःला ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या प्रकल्पाचा डिझायनर असल्याचे सांगत असे. राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण जागृती वाढविण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचे डिझाइन त्याने तयार केल्याचा त्याचा दावा होता. मात्र, या प्रकल्पासाठी मंजूर निधी आपल्याला मिळाला नाही आणि प्रकल्पात आपले नाव नोंदवले नाही, असा आरोप करत त्याने शालेय शिक्षण विभागाविरोधात आंदोलन छेडले होते.
२०२४ च्या ऑगस्ट महिन्यात तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्याने पुण्यात उपोषण सुरू केले होते. हे उपोषण जवळपास १२ दिवस चालले, मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आर्यने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्यागामुळे आणि शारीरिक थकव्यामुळे त्याला अचानक फिट आली. उपस्थितांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले.
दरम्यान, रोहित आर्यचे पुण्यातील कोथरूड येथील स्वरांजली सोसायटीत घर असून त्याचे आई-वडील तेथे राहतात. २०१७ पर्यंत तो पुण्यात राहून त्यानंतर मुंबईत स्थायिक झाला होता. तो वेळोवेळी पुण्यात येऊन कुटुंबीयांना भेटत असे. गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस चौकशीसाठी कोथरूड येथील घरी गेले असता घराला कुलूप असल्याचे निदर्शनास आले. घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





