पुणे : काँग्रेस पक्ष जरूर आत्मपरीक्षण करेल- आबा बागुल

पुणे: पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पीएमआरडीएची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. त्यात भाजप विजयी झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. याविषयी काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षनेते आबा बागुल यांनी या
तर पक्ष आत्मपरीक्षण करेल असे म्हटले आहे.
प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचा प्रभाव व बलाबल वाढविण्याचा अधिकार असतो. याच भावनेने पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पीएमआरडीएची निवडणूक काँग्रेस पक्षाने लढविण्याचा निर्णय घेवून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदू कदम यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. मात्र या निवडणूकीत काँग्रेसचे केवळ 1 मत कमी पडल्याने काँग्रेस पक्ष अपेक्षित विजय मिळवू शकला नाही, याबददल खेद होतो असे आबा बागुल यांनी म्हटले आहे.
तसेच या संदर्भात काँग्रेस पक्ष जरूर आत्मपरीक्षण करेल. तसेच भाजपचे उमेदवार शेवटच्या फेरीत 10 मतांनी विजयी झाले आहेत. जर काँग्रेसला एक मत मिळाले असते तर, भाजप व काँग्रेस उमेदवारांना समान 10 मते मिळाल्याने टायब्रेक झाला असता व कदाचित काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता, ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, असे बागुल यांनी सांगितले.
पुणे व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने पीएमआरडीए चे महत्व मोठे असून त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा प्रत्यक्ष प्रतिनिधी निवडून येवू शकला नाही, तरी पुणे व परिसराच्या विकासाला दिशा व गती देण्याचे काँग्रेस पक्षाचे कार्य यापुढेही जोमाने चालू राहील. तसेच या निवडणूकीमुळे शहरातील काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व नवा जोश निर्माण झाला असून आगामी मनपा निवडणूकांना काँग्रेस पक्ष अधिक सामर्थ्याने सामोरे जाईल असा विश्वास आहे असेही बागुल यांनी म्हटले आहे.




