Pune: धनकवडी आणि बालाजीनगर केंद्रावर बोगस मतदानाच्या तक्रारी

धनकवडी – खडकवासला मतदार संघातील धनकवडी आणि बालाजी नगर परिसरातील नागरिकांचा मतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मतदान केंद्रावर सकाळपासून संथगतीने मतदान झाले. दुपारी काहीशी गर्दी पाहायला मिळाली. धनकवडीतील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याची तक्रार मतदार करीत होते.
यामध्ये मतदार मतदानाच्या केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे कोणीतरी अगोदरच मतदान करून गेल्याचे प्रकार समोर आले. यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून येथे मतदान करणाऱ्यांची नावे, फोटोसह गायब झाल्याने अनेक जण मतदानापासून वंचित राहिले यामुळे या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी घसरली.
राजकीय पक्षांचे पोलिंग बूथ मतदान केंद्रांच्या बाहेर स्लीपा देत मतदारांना मार्गदर्शन करीत होते. मतदारांना घरापासून मतदान केंद्रांपर्यंत रिक्षासह खासगी वाहनांद्वारे आणणे आणि सोडविण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. धनकवडी, बालाजी नगर परिसरामध्ये मतदार केंद्रांची संख्या वाढवल्यामुळे मतदान केंद्रांवर गर्दी झाली नाही.
धनकवडीतील प्रियदर्शनी न्यू इंग्लिश स्कूल प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय, ध्येयपूर्ती हॉल, समर्थ बालवाडी, राजगड ज्ञानपीठ, शिवाजी मंदिर रक्षा लेखा सोसायटी, नवमहाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल व इतर या मतदान केंद्रांवर मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला.





