Pune: शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा

पुणे – पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण कराव्यात. तेथे उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या शाळांना बक्षीसही देण्यात येणार आहेत.
राज्यामधील सुमारे २४ हजार ७४१ शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेल्या आहेत. यंदाही राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरविले आहे. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाकरीता शाळांनी जवळचे कृषि विज्ञान केंद्र, कृषि शाळा, कृषि विभागातील कृषि सहायक , पर्यवेक्षक, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था, सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेता येणार आहे.
राज्यात उत्कष्ट परसबागा तयार होण्यासाठी परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याकरीता उत्कृष्ट परसबाग स्पर्धाचे तालुका व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक – ७५०० रुपये, व्दितीय क्रमांक – ५००० रुपये, तृतीय क्रमांक – ३००० रुपये याप्रमाणे बक्षिस देण्यात येणार आहे.
प्रत्येकी तीन शाळांना २००० रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक – १५००० रुपये, व्दितीय क्रमांक – ११००० रुपये, तृतीय क्रमांक – ७५०० रुपये याप्रमाणे बक्षिस देण्यात येणार आहे.





