Pune : आधार हरपलेल्या कुटुंबाला ६० लाख रूपयांची भरपाई

पुणे – अपघातात दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याप्रकरणी नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल असलेला दावा समुपदेशनामुळे निकाली निघाला. अपघातात ५ वर्षांपूर्वी कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुबियांना ६० लाख रुपये मिळणार आहेत. समुपदेक ॲड. अतुल गुंजाळ यांनी मयत व्यक्तीचे कुटुंबिय आणि विमा कंपनी यांच्यासोबत यशस्वी समुपदेशन केले. या निर्णयामुळे दाव्यासाठी लागणारा वेळ, पैसा वाचला आहे.
जीवनदास कोळी असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. ते १३ जुलै २०२० मध्ये एक्टिवा मोटरसायकलवरून सासवडकडून जेजुरीकडे चालले होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने एक्टीव्हाला धडक दिली. कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
कोळी हे आडतदार होते. त्यातून दरमहा ४० हजार रुपये उत्पन्न होते. त्यामुळे त्यांच्या कुटुबियांनी नुकसान भरपाईसाठी ॲड. अक्षय सुनिल महामुनी यांच्यामार्फत टेम्पोचे मालक व विमा कंपनी असलेल्या एचडीएफसी विरुद्ध दावा दाखल केला होता. तर, विमा कंपनीतर्फे ॲड. महेश शेगोरी व विमा कंपनीचे अधिकारी रवींद्र जाधव यांनी काम पाहिले. हा दावा जिल्हा न्यायाधीश एम.जी. चव्हाण यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यांनी समुपदेशनासाठी ॲड. अतुल गुंजाळ यांच्याकडे प्रकरण पाठवले. त्यांनी हा दावा चालवून निकाली लागण्यास वेळ लागेल.
तसेच, त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर आणखी ५ ते १० वर्षाच्या कालावधी जाण्याची शक्यता आहे, असे कुटुंबियांना समजाविले. तर, आदेशानंतर रक्कमेवर व्याज द्यावे लागेल, हे विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविल्यानंतर दावा निकाली निघाला. रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन आणि पुणे विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश सोनल पाटील यांच्या हस्ते अर्जदारांना देण्यात आला.





