pune : जिल्हाधिकारी कार्यालय घोषणांनी दणाणले
Pune:

दिल्लीतील आंदोलन जबरदस्ती दडपल्याचा विविध संघटनांकडून निषेध
पुणे – नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांचे आंदोलन जबरदस्तीने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील विद्यार्थी, पालक, विविध पक्ष, सामाजिक संघटना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जबाब दो आंदोलन केले. या वेळी धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, इन्कलाब जिंदाबाद, भाजप सरकारच्या दडपशाहीचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
आंदोलनादरम्यान काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
आंदोलकांनी नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप केला, तसेच या प्रकरणानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, न्यू स्टुडंटस एँड यूथ फेडरेशन पुणे, भारत जोडो अभियान, मानववादी जनशक्ती, लोकशाही उत्सव समिती, लोकशाही युवा संघटना, लोकस्वातंत्र्य संघटना, श्रमिक महिला मोर्चा, समाजवादी पार्टी, तसेच इतर विविध सामाजिक व विद्यार्थी संघटनांनी सहभाग नोंदविला.





