Pune: पहाटे गारवा तर दिवसभर उकाडा

पुणे : शहरात पहाटे गारवा तर दिवसभर उन्हाचा उकाडा असे विचित्र हवामान पुणेकर अनुभवत आहेत. गुरूवारी (दि. ६) पुण्यातील लोहगाव येथे सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
मागील दोन दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे १७ अंशावरील किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले. त्यामुळे रात्री व पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. आज, पहाटे तळेगाव आणि हवेली परिसरात सर्वांत कमी १२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर अन्य भागातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली आहे.
तर, दुसरीकडे कमाल तापमानात गेल्या २४ तासांत एक ते दीड अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता. लोहगाव आणि चिंचवड येथे सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
तर मगरपट्टा परिसरात ३७.३, एनडीए येथे ३७.२, शिवाजीनगरला ३६.७ तर पाषाण परिसरात ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.





