पुणे: विसर्जन मार्गांची अवघ्या चार तासांत स्वच्छता

पुणे – शहरात विसर्जन मिरवणुका संपताच मनपा कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्व प्रमुख विसर्जन मार्ग चार तासांच्या आत स्वच्छ केले. या मोहिमेत तब्बल 334 टन कचरा संकलन करण्यात आला. त्यात सर्वाधिक प्लॅस्टिक बाटल्या, बूट-चपला तसेच थर्माकोलच्या वस्तूंचा समावेश आहे.
मिरवणुका संपल्यानंतर भर पावसात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता केली, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. महापालिकेने गणेशोत्सवासाठी 4 हजार 300 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या माध्यमातून दिवसातून तीन वेळा शहरात स्वच्छता केली जात होती.
विसर्जन मिरवणुकीतही मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याने महापालिकेने मिरवणुका संपताच शहरात स्वच्छतेला सुरूवात केली.
यंदा पावसामुळे गुलाल वाहून गेल्याने महापालिकेस केवळ कचरा संकलन करावे लागत. या मोहिमेत 163 टन ओला कचरा, 139 टन सुका कचरा, 35 टन सजावटीचे साहित्य तर चप्पल- बूट आणि कपड्यांचा सुमारे 7 टन कचरा निघाला.





