Pune : शहरातील रिक्षा, कॅबचालक संपावर

पुणे – ओला, उबेर आणि रॅपिडो या खासगी कंपनीच्या विरोधात काही कॅब व रिक्षा व्यावसायिक संघटनांकडून संप पुकारण्यात आला आहे. मात्र, पुणे शहरात शुक्रवारी (दि. १८) या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यामुळे पुणे विमानतळ, रेल्वे स्टेशनसह एसटी स्थानकाबाहेर रिक्षा आणि कॅब मिळविताना प्रवाशांची तारांबळ उडाली होती.
परिवहन मंत्रालय ओला-उबेर आणि रॅपिडोसारख्या कंपन्यांसमोर हतबल झाले असून, या बेकायदा कंपन्यांमुळे ग्राहक, तसेच चालकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी राज्यातील रिक्षा आणि कॅब चालक यांनी मागील दोन दिवसांपासून बेमुदत बंद पुकारल्याचे भारतीय गिग कामगार मंचाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे आज दिवसभर पुणे विमानतळावरील एरोमाॅल, पुणे रेल्वे स्टेशन, एसटी स्थानकासह शहरात कॅब व रिक्षांची वर्दळ होती. दरम्यान, या संपात काही संघटनांमध्ये फूट पडली असून, आज दिवसभरात संपाला समिश्र प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत सहभागी नाही
रिक्षा-कॅब चालक-मालकांच्या समस्यांबाबत शासनासोबतच चर्चा सुरू असताना आंदोलन किंव बंद पुकारण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे महाराष्ट्र ऑटो रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन या संपात सहभागी नसल्याचे संघटनेकडून सांगितले. ज्या रिक्षा, कॅब चालकांना जबरदस्तीने संपात सहभागी होण्यास भाग पाडणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
रेल्वे स्टेशनवरून हडपसरला जायचे, तर रिक्षावाल्याने चारशे रुपये सांगितले. त्यांना मीटरने चला बोललो, तर नाही म्हणाले. मुख्य रस्त्याला असेल तर साडेतीनशे घेतो. आतमध्ये असेल तर चारशेच्या खाली नाही, असे उत्तर मिळाले.
एक प्रवासी – पुणे रेल्वे स्टेशन
कॅब बंद असल्याचे आम्हाला पुण्यात आल्यावर समजले. रिक्षावाले आता अव्वाच्या सव्वा दर सांगत आहे. त्यात लगेजचे वेगळे पैसे. दोन ते तीन रिक्षा सोडल्यावर आता या काकांनी मीटरने जाऊ, असे सांगितल्यामुळे दिलासा मिळाला.
एक प्रवासी – पुणे विमानतळ एरोमाॅल
या मागण्यांसाठी संप…
– ओला, उबर, रॅपिडोसाठी सरकारी मीटर दर लागू करा
– बाइक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात सुरू करू नये
– रिक्षा व कॅब परमिटवर मर्यादा आणावी
– रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा
– महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करा
– वाहतूक दंडाबाबत अभय योजना राबवावी.





