Pune City | वीजबिलावरील नावबदल आता घरबसल्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – खरेदी-विक्री, बक्षीस पत्र, मृत्यू, वारसा आदी कारणांमुळे मिळकतीच्या मालकी हक्कात तथा नावात बदल होतो. तसाच बदल वीजग्राहकाला वीजबिलावरील नावात करावा लागतो. हा बदल वीजग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन अर्जाने करता येईल. यासाठी महावितरण कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही. महावितरणच्या मोबाईल ॲपवर व पोर्टलवर ही सुविधा २४ तास उपलब्ध आहे.महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा मोबाईल ॲप व संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ग्राहकाला युजर नेम आयडी तयार करुन ऑनलाईन सेवांचा लाभ घेता येतो. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, वीजबिल पाहणे, भरणे, तक्रारी नोंदवणे, पाठपुरावा करणे, रिडींग नोंदवणे, वीजबिल भार कमी किंवा जास्त करणे, जुन्या बिलांचा इतिहास, बिल कॅलक्युलेटर यांसह नावात बदल करणे या सुविधा मोबाईल ॲप तसेच https://wss.mahadiscom.in/wss/wss या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत.ग्राहकांनी मोबाईल ॲप, संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवांचा वीजग्राहकांनी वापर करावा, असे आवाहन महावितरण पुणेचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.
ॲप नोंदणी अशी करा..
महावितरण ॲप इन्स्टॉल केल्यास प्रथम भाषा निवडून नोंदणीसाठी सदस्य बना. साइन अपवर क्लिक करा. त्यानंतर १२ अंकी वीजग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल, लॉगिन आयडी, पासवर्ड टाकून नोंदणी करावी. लाॅगिन केल्यास सर्व परवानग्या स्विकारल्या की ॲप सक्रिय होते.
नावातील बदल..
ॲपच्या डाव्या कोपऱ्यात सेवांची लिंक असून त्यातील नाव बदल पर्याय निवडा. ग्राहक क्रमांक निवडल्यास ‘प्रपत्र उ’ येते. बदल करावयाची किंवा नवीन मालकाची माहिती भरावी. बदलाचे कारण निवडून अटी मान्य कराव्यात व पुढे जाऊन मिळकतीचा पुरावा व Form x चा फोटो अपलोड करावा. माहिती अपलोड होताच नोंदणी क्रमांक मिळतो.





