Pune : टँकरची धडक बसल्याने चिमुरड्याचा मृत्यू

पुणे : पाण्याचा टँकर मागे (रिव्हर्स) घेताना झालेल्या अपघातात दोन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी वारजेतील गणपती माथा भागात घडली. टँकरचालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल करून टँकरचालकाला अटक केली आहे. आजीच्या डोळ्यांदेखत ही घटना घडल्याने आजीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
बिसुलाल ऊर्फ सनी प्यारेलाल बारसकर (३३, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. बारसकर याच्यासह टँकर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधोक्षक महेश वहाळे (१८ महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याबाबत ६५ वर्षीय प्रत्यक्षदर्शीने फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. ५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारसकर हा टँकर चालक आहे. शनिवारी सायंकाळी तो गणपती माथा भागातील विशाल बिल्डिंग व समोरील भागात आला होता. या वेळी तेथेच संबंधित बालक हा त्याच्या आजीसोबत थांबला होते. पाण्याचा टँकर रिकामा करून चालक पुन्हा जाण्यासाठी निघाला.
त्या वेळी टँकर रिव्हर्स घेत असताना बालकास जबर ठोकर बसली. इमारतीबाहेरील वॉचमन आणि बालकाची आजी हातवारे करून चालकाला थांबण्याचा इशारा करीत असतानाही त्याने दुर्लक्ष करून रिव्हर्स घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार झालेल्या चालकाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत.





