Pune : सतीश वाघ खून प्रकरणात आरोपपत्र

पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात सहा जणांविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्र केले आहे. अक्षय जावळकर आणि वाघ यांची पत्नी माेहिनी याचे मुख्य सूत्रधार आहेत, तर माेहिनीने सतीश यांच्यावर जादूटोणा करण्यास सांगितले होते, अक्षयने स्वत: पैसे जमवून ५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.
सतीश तात्याबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी) यांचे अपहरण करून निर्घृण खून केल्याची घटना ९ डिसेंबर २०२४ राेजी घडली होती. उरळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात वाघ यांच्यावर शस्त्राने ७२ वार करून खून करून मृतदेह घाटात फेकून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणात सतीश यांची पत्नी मोहिनी, अक्षय जावळकर, आतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांना अटक करण्यात आली होती. सतीश यांच्या मुलाने याबाबत हडपसर पोलिसांत फिर्याद दिली होती.
माेहिनी आणि अक्षय हे २०१३ मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. अक्षय हा सतीश यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर राहात होता. त्याने सतीश यांच्या मुलाला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. अक्षय आणि मोहिनी यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. सतीश यांना संशय आल्याने त्यांनी माेहिनीकडील आर्थिक व्यवहार काढून घेतल्यानंतर अक्षय याने दुसरीकडे घर घेतले. अक्षय आणि मोहिनी यांनी संगनमत करून वाघ यांचा खून करण्याचा कट रचला.
या प्रकरणात पोलिसांनी न्यायवैद्यकीय पुरावे गोळा केले, तसेच आरोपी, फिर्यादी, साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. सतीश यांचा मोबाइल संच, गुन्ह्यात वापरलेली मोटार, शस्त्रे जप्त करण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथकाने तपास करून आरोपपत्र दाखल केले.





