पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती बदलताच तीन विभाग प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात गुळ-भुसार, फुलबाजार आणि मालमत्ता विभाग प्रमुखांचा समावेश आहे. मात्र, यापूर्वी अनेक तक्रारी असणार्या विभागप्रमुखांना बाजार समितीने पाठीशी घातले आहे. भुसार विभागप्रमुख आनंदा उर्फ बाळासाहेब कोंडे यांची बदली मालमत्ता विभाग प्रमुखपदी केली आहे. भुसार विभागप्रमुख म्हणून काळुराम घुले यांची नियुक्ती केली आहे. मालमत्ता विभागप्रमुख निलेश हिंगे यांची बदली विधी विभागात केली आहे. फुलबाजार विभागप्रमुख दादासाहेब कड यांची बदली केली आहे. फळे भाजीपाला विभागातील ज्येष्ठ लिपिक संतोष कुंभारकर यांची फुलबाजार विभागप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. तीनच विभाग प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. इतर विभागाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या बदल्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. इतर विभाग प्रमुखांच्या बदल्या का केल्या नाहीत, असा प्रश्नही विचारला जात आहे. बदल्या करायच्याच होत्या, तर सर्वांच्या करायच्या होत्या. ‘येत्या काही दिवसांमध्ये इतर विभागातील विभागप्रमुखांच्या देखील बदल्या करण्यात येणार आहेत. एकाच वेळी सर्वांच्या बदल्या न करता टप्प्याटप्याने करण्यात येणार आहेत.’ – प्रकाश जगताप, सभापती पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.