PUNE: कारागृहातील समाज बांधवांप्रती दृष्टीकोन बदलावा – डॉ. विनय सहस्रबुद्धे

पुणे – कारागृहातील आणि कारागृहाबाहेरच्या विश्वांमध्ये फाळणी झाली असून, त्यामध्ये सेतूबंधन होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी सामाजिक जाणीव तल्लख ठेवून कारागृहातील समाजबांधवांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळातर्फे प्रेरणापथ प्रकल्पांतर्गत कारागृहातून मुक्त झालेल्या बांधवांना रोजगार प्रदान आणि त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन तसेच समुपदेशन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, पोलीस आयुक्त रितेश कुमार, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप आदी उपस्थित होते.
देशातील कारागृहांमध्ये ७७ टक्के कच्चे कैदी असून, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तुरुंगात खितपत पडले आहेत. न्यायालयांवरचा खटल्याचा ताण, कारागृहांच्या व्यवस्थापनासाठी अपुरे मनुष्यबळ, अपुऱ्या सोयी-सुविधा, स्वच्छतेचा अभाव, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे कारागृहे विपन्नावस्थेत आहेत. हा कैद्यांचा नाही तर समाजाचा दोष आहे, असे आवाहन मुळे म्हणाले.
कारागृहातील बांधवांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भोई प्रतिष्ठान करत आहे, असे निंभोरकर म्हणाले. कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैदी बांधवांना आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी प्रेरणापथ प्रकल्प मदत करणार आहे, तसेच या बांधवांच्या पाल्यांना चांगले करिअर घडवण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन सेवा देणार आहे. त्यामुळे या बांधवांच्या आयुष्यात नवी पहाट उजाडेल, असा विश्वास भोई यांनी व्यक्त केला. उदय जगताप यांनी प्रास्ताविक केले.
“कारागृहातील बांधवांना कौशल्य प्रशिक्षण घेऊन सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी न्यायालय, पोलीस, प्रशासन आणि नागरिकांनी एकजुटीने काम केले पाहिजे.” – डाॅ. ज्ञानेश्वर मुळे, सदस्य, मानवाधिकार आयोग





