पुणे | मानवी हक्क आयोगाकडून येरवडा कारागृहाची तपासणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव एन. के. पाटील आणि सदस्य एम. ए. सय्यद यांनी दि. १६ ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट घेऊन तपासणी केली.
दरम्यान, एन. के. पाटील आणि एम. ए. सय्यद यांनी कारागृहातील गांधी यार्ड, बंदी बरॅक, कारखाना विभाग, दवाखाना विभाग, अतिसुरक्षा विभाग, व्ही. सी. कोर्ट, ई-मुलाखत या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली.
तसेच बंद्यांना देण्यात येणाऱ्या कारागृहातील सुविधा, आहार, उपहारगृह, दूरध्वनी सुविधा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, बंदी मुलाखत, ई- मुलाखत वैद्यकीय सुविधा, अडचणी संदर्भात आढावा घेतला. कारागृहातील सुरक्षा, महिला बंद्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, नवीन बांधकामे, बंदी आरोग्य याबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पी. पी. कदम, उपअधीक्षक आर. ई. गायकवाड, एम. एच. जगताप, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंदा एस कांदे, तुरुंगाधिकारी सी. आर. सांगळे आदी उपस्थित होते.





