Pune: चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडला कुटुंबच बनवले

पुणे – पाच वर्षांपूर्वी चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा प्रचंड वादळ निर्माण झाले. ते कोल्हापूरचे आहेत, बाहेरचे आहेत येथंपासून त्यांच्या नावाची खिल्ली उडवली गेली. अशा परिस्थितीमध्ये एखादा आमदार एखाद्या मतदारसंघाला आपलेसे करतो, तेव्हा त्याची पाठ थोपटणे आवश्यकच वाटते. कारण आज चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडला स्वतःचा किल्ला करून टाकला आहे.
गेल्या पाच वर्षांत त्यांनी कोथरूडला आपले घर बनविले, कुटुंब बनविले, त्याचा दोन कार्यक्रमांमधून मला स्वतःला आलेला अनुभव आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी आपल्या ‘प्रतिपक्ष’ युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून केले आहे.
तोरसेकर यांच्या वक्तव्यानुसार, ‘हा माणूस संघाचे काम करताना माणसं जोडायला शिकला आणि जोडलेली माणसं एका मतदारसंघामध्ये सगळ्या जनमानसाशी जोडून घेण्याचा पराक्रम करून दाखविला. त्याला प्रोत्साहन देऊन कौतुक केले पाहिजे, असे मला वाटते. म्हणून पाटील यांना पहिल्या फेरीत फटाफट उमेदवारी देऊन टाकली, त्यासाठी मी त्यांचे नाही, तर भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन करेन.’
ते म्हणतात, ‘आपले, पक्षाचे काही स्थान निर्माण करायचे, हा त्यांचा हेतू नाही, तर लोकांना मार्गदर्शन करणे आणि सामान्य माणूस कामाला लागला, तर कोणत्याही सरकारपेक्षा किती स्वयंभू आणि पराक्रमी होऊ शकतो, याचा एक वस्तुपाठ पाटील यांनी निर्माण केला आहे. त्यांनी एक मॉडेल होऊन भाजपा पक्ष संघटना व आमदारांनी कसे काम करायचे आहे, हे दाखवून दिले आहे.
ते म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी ज्या माणसाच्या विरोधात जे कोणी सारे विरोधक होते, त्यांनी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजपामध्येसुद्धा नकारात्मकता होती. त्यावर काही बोलण्यापेक्षा पाटील यांनी मतदारसंघ जिंकला. लोकांना जिंकून घेतलं. बारामती मतदारसंघाबद्दल इतक्या हक्काने पवार कुटुंब बोलू शकते. आज ५० वर्षांनी त्याची पायाभरणी कशी झाली होती, त्याची चुणूक आपल्याला कोथरूडमध्ये पाहायला मिळते.
तोरसेकर म्हणतात, ‘सरकारी योजना राबविणे ही त्यांची जबाबदारीच आहे; पण घटनात्मक परिस्थितीपलीकडे जाऊन काम करणारा, मतदारांच्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन काम करणारा असा आमदार मला कौतुकास्पद वाटतो. मतदारसंघातील संपन्न लोकांना आपल्या गरजू लोकांपर्यंत घेऊन जाणे, हे त्यांनी केलेले सर्वात मोठे काम आहे. त्या माध्यमातून भूगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांतिस्थान निर्माण केले गेले. हे फार मोठे काम आहे, असे तोरसेकर यांनी नमूद केले.
संघटनात्मक काम करून सामाजिक पुरुषार्थ निर्माण करणे, नागरिकांचे जीवनमान उंचावावे म्हणून काम करणे आजच्या काळात दुर्मीळ आहे. अशा छोट्या छोट्या प्रयत्नांतून समाज उभा राहतो. राष्ट्र निर्माण होते. त्याचा वस्तुपाठ पाच वर्षांत पाटील यांनी दाखवून दिल्याचे तोरसेकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणतात, की चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षांत आपल्या मतदारसंघात जे काम उभे केले, त्याचा प्रत्यय तुम्हाला लोकसभा निवडणुकीत आला आहे. त्यांचे काम आपल्या पक्षाची लोकप्रियता, संघटना वाढविण्यासाठी नाही, तर प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक विभागात, कॉलनीत आपण समाजाचे देणे, लागतो ही भावना जागी करण्यासाठी आहे.
‘‘चंद्रकांत पाटील निवडून येणे ही त्यांची, भाजपाची गरज राहिलेली नाही, तर कोथरूडमधील सामान्य मतदारांची गरज होऊ लागली आहे. पक्षासाठी कोथरूड ही एक जागा पक्की आहे. एखादी जागा पक्षासाठी पक्की करणे, हे सगळे राजकारणी करतात. मात्र तेथील सामान्य जनतेला दादांनी एखाद्या सुंदर वस्त्रासारखे एकत्र गुंफले आहे. त्यात समाजघटक जोडला गेला आणि त्याची प्रक्रिया अजून सुरू आहे.’’ – भाऊ तोरसेकर





