पुणे- छ. संभाजीनगर एक्स्प्रेस-वेसाठी पुढचे पाऊल

पुणे – समृद्धी महामार्गाने नागपूरहून छत्रपती संभाजीनगरला अवघ्या चार-साडेचार तासांत जाता येते. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथून पुणे येथे पोहोचणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतुकीच्या कोंडीला टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज होती. ही गरज ओळखून आता पूणे ते छत्रपती संभाजीनगर या 230 किलोमीटर सहा पदरी ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे निर्मिती केली जात आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या एक्स्प्रेस-वे निर्मितीबाबत सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्यात हा करार झाला.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर या सध्या असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ ही अनेक पटीने वाढली आहे. काही दिवसापूर्वी मी स्वत: नगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ही कोंडी अनुभवली. या दोन्ही महानगरांना जलद गतीने जोडणाऱ्या एक्स्प्रेस-वेची नितांत गरज होती. त्या दृष्टीनेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची निर्मिती आपण केली. सध्या असलेल्या मार्गालाही चांगले करण्याची गरज असून, लवकरच हे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.
पुणे रिंगरोडला जोडणार महामार्ग
छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा महामार्ग पुणे येथील रिंगरोडला मिळेल. पुणे येथील रिंगरोडला हा रस्ता मिळणार आहे, त्या रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. पुण्यातील रिंग रोडही एक्स्प्रेस-वे चे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णत: तयार असेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
असा आहे ग्रीन कॅरिडोअर
– महामार्गाची एकूण लांबी असणार सुमारे : 230 कि.मी.
– पुणे, नगर आणि बीड या तीन जिल्ह्यांतून जाणार
– १२ तालुके आणि १२२ गावांतून जाणार
– महामार्गासाठी २ हजार ८५५ हेक्टर जमीन संपादित करणार
– महामार्ग सहा पदरी असणार





