Pune : होळीनिमित्त मध्य रेल्वेकडून जादा ट्रेनचे नियोजन

पुणे : होळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वेला मोठी गर्दी होते. प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष आठ फेऱ्यांसह, मुंबई-नागपूर, मडगाव आणि नांदेड या मार्गावर एकूण २८ फेऱ्या होणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून जादा रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, पुण्यातून दि. ११ मार्चपासून या विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.
पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष ट्रेनच्या चार फेऱ्या होणार असून, ट्रेन क्रमांक ०१४६९ ही दि. ११ आणि १८ मार्च २०२५ (मंगळवारी) रोजी तर ट्रेन क्रमांक ०१४६७ ही दि. १२ आणि १९ मार्च रोजी (बुधवारी) पुणे येथून दुपारी ३ वाजून ५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोहचेल. ट्रेन क्रमांक ०१४७० ही दि. १२ आणि १९ रोजी (बुधवारी), तर ट्रेन क्रमांक ०१४६८ ही दि. १३ आणि २० मार्च रोजी (गुरुवारी) नागपूरहून सकाळी आठ वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहोचेल. या सर्व ट्रेनला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा याठिकाणी थांबा दिलेला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेनच्या आठ फेऱ्या होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेनच्या चार फेऱ्या होणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेनच्या चार तर लोकमान्य टिळक टर्मिनस-हुजूर साहिब नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेनच्या चार फेऱ्या होणार आहेत.
या साप्ताहिक विशेष ट्रेनचे बुकिंग दि. २४ फेब्रुवारीपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल. तरी प्रवाशांनी आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





