कात्रज – कात्रज चौक तसेच कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह केली. यावेळी आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते. यादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. मोरे व त्यांच्यासोबतच्या समर्थकांनी घोषणाही दिल्या. त्यानंतर वसंत मोरे यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याबद्दल जमावबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज चौकातील भूसंपादनात जागा कमी भरत असताना पूर्ण मोबदला का दिला, पन्नास वर्षांपूर्वी ताब्यात आलेल्या पंपिंग स्टेशन व राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची जागेचे पैसे दिले का ? पालिकेने पैसे दिलेली जागा मोजून दाखवावी. दुष्काळात तयार झालेला आणि उपयुक्त रस्ता निवासी झोन होतो कसा, गावाचा रस्ता बंद करण्याची दिवा स्वप्न पाहू नका, अशा शब्दांत वसंत मोरे यांनी टीका करीत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. ‘पुणे महापालिका आयुक्त व आमदार योगेश टिळेकर यांचा पाहणी दौरा होता. त्यासाठी आमचा विरोध नव्हता. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांना यांनी डावलले. मागील पंधरा वर्षापासून आम्ही कात्रज व परिसरात दिवस रात्र झटून कामे करीत आहोत. ते यांना दिसत नाही का. कात्रज मध्ये यांचे काय योगदान आहे. हे यांनी दाखवून द्यावं. मागील अनेक वर्षापासून कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. हे त्याचे अपयश झाकण्यासाठी या गोष्टी करत आहेत का? आंदोलने करायची का नाहीत, असं काय आंदोलन केले की गुन्हा दाखल केला.’ – वसंत मोरे, नेते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)