Pune : पिता-पुत्राच्या मृत्यूप्रकरणी चाळ मालकावर गुन्हा दाखल

पुणे : वारजे भागात शाॅर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत वडील आणि मुलाच्या मृत्यू झाल्याची दुर्घटना नुकतीच घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी खोली मालकाविरुद्ध वारजे पाेलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नितीन नारायण बराटे (वय. ४२, रा. हर्षवर्धन बिल्डींग, वारजे गावठाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश मोहन मुडावत (वय २४, रा. नितीन बराटे चाळ, गोकुळनगर, वारजे माळवाडी) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील गोकुळनगर परिसरात नितीन बराटे याची चाळ आहे. चाळीतील पत्र्याच्या खोलीत प्रकाश मुडावत, त्याचे वडील मोहन आणि मोठा भाऊ पप्पू हे राहायला आहेत. वर्षभरापूर्वी प्रकाशच्या आईचे निधन झाले होते. प्रकाश, माेहन, पप्पू हे मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते.
९ एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुडावत राहत असलेल्या पत्र्याच्या खोलीत शाॅर्टसर्किट झाले. शाॅर्टसर्किट झाल्यानंतर खोलीला आग लागली. आगीत सिलिंडरने पेट घेतला. सिलिंडरच्या स्फोटामुळे आग भडकली. आगीत प्रकाशचे वडील मोहन आणि भाऊ पप्पू गंभीर होरपळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचे उघडकीस आले. पत्र्याच्या खोलीत खिडकी नव्हती, तसेच बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा होता.
पुरेशी काळजी न घेतल्याने दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी चाळमालक नितीन बराटे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते तपास करीत आहेत.





