Pune : कॅप फेरीची गुणवत्ता यादी १० जूनला

पुणे : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राज्यातील १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. पहिल्या प्रवेश फेरीअंतर्गत नोंदणी करून अर्ज भरण्यासाठी मुदत गुरुवारी (दि. ५) संपली आहे. कॅप फेरीची गुणवत्ता यादी १० जून रोजी जाहीर होणार आहे.
राज्यातील अकरावी प्रवेशासाठी ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, एकूण प्रवेश क्षमता २१ लाख २३ हजार ४० आहे. त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता १८ लाख ९७ हजार ५२६, तसेच कोटा प्रवेश क्षमता २ लाख २५ हजार ५१४ इतकी आहे. राज्यभरातून १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क जमा केले आहे.
नियमित फेरी (कॅप राउंड) साठी ११ लाख २९ हजार ९३२, इनहाउस कोट्यासाठी ६४ हजार २३८, व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोट्यासाठी ३२ हजार ७२१, अल्पसंख्याक (मायनॉरिटी) ४७ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कोटाअंतर्गतच्या प्रवेशाच्या शून्य फेरीची गुणवत्ता यादी ८ जून रोजी जाहीर होऊन ९ जून ते ११ जून या कालावधीत प्रत्यक्ष प्रवेश होतील. कॅप फेरीची गुणवत्ता यादी १० जूनला जाहीर होऊन ११ जून ते १८ जून यादरम्यान प्रवेश होतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
पुणे विभागाचा जिल्हानिहाय प्रवेशाबाबत तपशील
जिल्हा – विद्यार्थी नोंदणी – अर्ज भाग १ भरला – अर्ज भाग २ भरला
पुणे – ११९८५३ -११५४१६ -१०५५५३
अहिल्यानगर – ५२२३२ – ५१४१३ – ४९५१७
सोलापूर – ४७०६९- ४६०४३-४३६३१
एकूण – २१९१५४ – २१२८७२ -१९८७०१





