Pune | ‘या’ प्रवाशांच्या पिकअपसाठी कॅबला परवानगी

पुणे – विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर कॅबला पिकअपसाठी परवानगी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दिव्यांग, गर्भवती, एकटी महिला अथवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना घेण्यासाठी कॅबला विमानतळ प्रशासनाने परवानगी दिली आहे. ही सेवा प्रवाशांना मोबाइल ॲपवर देखील उपलब्ध होणार आहे.
एरोमॉल प्रशासनाने या संदर्भात कॅबची सेवा देणाऱ्या कंपनीशी बोलणी केली असून लवकरच संबंधित कंपनी आपल्या यंत्रणेत आवश्यक ते बदल करणार आहे. त्यानंतर लवकरच प्रवाशांना कॅब आरक्षित करतानाच त्यांना पिकअपचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
टर्मिनलच्या आवारात वाहनांची गर्दी होऊन त्याचा त्रास प्रवाशांना होऊ नये याकरिता विमानतळ प्रशासनाने जुन्या व नवीन टर्मिनलवर कॅबला पिकअपसाठी परवानगी दिलेली नाही. यामुळे ज्येष्ठ तसेच दिव्यांग प्रवाशांसह महिलांची गैरसोय होत होती. परंतु. सदर बाब निदर्शनास येताच यातून गर्भवती, एकटी महिला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना वगळले असून काही दिवसांपूर्वीच अशा प्रवशांना घेण्यासाठी कॅबला परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, त्यासाठी त्यांना नवीन टर्मिनलवरच्या उपलब्ध काउंटरवर जावे लागत होते. परंतु, आता प्रवाशांना ॲपवरच पिकअपची सेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलवर दोन ई-बस उपलब्ध केलेल्या आहेत. यातून टी २ ते एरोमॉल येथे प्रवाशांना मोफत नेण्यात येते. एरोमॉलमधून प्रवाशांना कॅब उपलब्ध होते. दोन्ही बसच्या माध्यमातून दररोज सुमारे तीन हजार प्रवाशांची वाहतूक होते. प्रवाशांच्या सोयीसाठी नऊ गोल्फ कार्टसुद्धा उपलब्ध आहेत. यातून देखील काही प्रवाशांची वाहतूक केली जाते.
“दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती यांच्या सोयीसाठी कॅबला पिकअपसाठी परवानगी दिलेली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना काउंटरवर येऊन माहिती देणे अनिवार्य होते. आता, अशा प्रवाशांना मोबाइलवरच कॅब आरक्षित करताना पिकअपचा पर्याय दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनी ॲपमध्ये आवश्यक ते बदल करीत आहे. लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.” – व्ही. रजपूत, उपाध्यक्ष, एरोमॉल, पुणे विमानतळ.
एरोमॉलमध्ये प्रवासी वाहतूक
कॅबची दैनंदिन ये-जा : १२ हजार वेळा
दैनंदिन प्रवासी वाहतूक : ९ हजार
प्रवाशांकडून सेवेचा वापर : ३० टक्के





