Pune Bribery Case – तक्रार अर्जाच्या चौकशी प्रकरणात तब्बल २८ लाखांची लाच स्वीकारताना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील महिला सहायक पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी पकडले. बंडगार्डन रस्ता परिसरातील एका तारांकित हॉटेलसमोर सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणात एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे. महिला सहायक पोलीस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार (४९, रा.स्वारगेट पोलीस लाईन) आणि संभाजी शिवाजी चव्हाण( रा.चिमण्या गणपती चौक, सदाशिव पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेत असताना तोटेवार यांच्याकडे काही तक्रार अर्ज चौकशीसाठी सोपविले होते. यातील एका प्रकरणात त्यांनी ३० लाखांची लाच मागितली होती. सुरुवातीला तक्रारदाराकडून २ लाख घेतल्यानंतर बाकीच्या २८ लाखांची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. याची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. लाच स्वीकारण्यासाठी तोटेवार यांनी खासगी व्यक्ती संभाजी चव्हाणला पाठवले होते. बंडगार्डन परिसरातील हॉटेल कोनार्डच्या प्रवेशव्दारावर लाच घेताना चव्हाणला पकडले. त्यानंतर तोटेवार यांनाही ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर एसीबी पथकाने पुणे पोलीस आयुक्तालयातील तोटेवार यांच्या कार्यालयासह त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सतीश वाळके करत आहेत. नुकतीच पदोन्नती वैशाली तोटेवार यांची नुकतीच पदोन्नती होऊन त्यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. शुक्रवारी त्यांना पुणे पोलीस दलातून कार्यमुक्त करण्यात आले होते. नव्या पदावर रुजू होण्यापूर्वीच त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.