ACB Action: राज्यात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई; नगरपालिका प्रशासनात खळबळ
ACB Action: पोलीस निरीक्षक प्रमोद आहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या लाचखोरीच्या प्रकरणात नगरपरिषदेतील आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

ACB Action: रस्त्यांच्या कामांची बिले काढणे आणि सुरक्षा ठेव (Security Deposit) मोकळी करून देण्यासाठी ६ टक्के लाचेची मागणी करणाऱ्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या लेखाधिकाऱ्यावर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. विकास चव्हाण असे या संशयित अधिकाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे नगरपालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार कंत्राटदाराच्या कंपनीला कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या एकूण ७७ विकासकामांचे कंत्राट मिळाले आहे. यातील दोन कामांची १७ लाख ४४ हजार रुपयांची देयके आणि जुन्या कामांची ४ लाख ९९ हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम, अशी एकूण २२ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली होती. ही रक्कम जमा करून दिल्याच्या मोबदल्यात ६ टक्के दराने १ लाख ३४ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी केली होती.
एसीबीची पडताळणीनंतर कारवाई –
या भ्रष्टाचारामुळे हतबल झालेल्या कंत्राटदाराने ९ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर १० डिसेंबर रोजी एसीबीने या तक्रारीची गुप्त पडताळणी केली. या पडताळणीमध्ये चव्हाण यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या पुराव्यांच्या आधारे ३० एप्रिल २०२६ रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण –
या प्रकरणाबाबत कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले की, “लेखाधिकारी विकास चव्हाण यांना महिनाभरापूर्वीच कार्यमुक्त करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली असून, संबंधित विभागाला याबाबत अधिकृत कळवण्यात येईल.”
पोलीस निरीक्षक प्रमोद आहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या लाचखोरीच्या प्रकरणात नगरपरिषदेतील आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.





