Pune: बोलघेवड्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला ऊत

सिंहगडरस्ता – विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत इच्छुक उमेदवारांची तिकीट मिळवण्यासाठीची धडपड सुरू आहे. विद्यमान पेक्षा आपणच कसे सरस आहोत आणि निवडून येण्यासाठीची गणिते तयार करून, बायोडाटा करून इच्छुक उमेदवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावत आहेत.
इच्छुक उमेदवाराला सर्वांचेच ऐकावे लागत आहे. जो भेटतो तो सांगतो भाऊ तुमचेच नाव सर्वत्र आहे, वातावरण तुम्हाला अनुकूल आहे, थोडासा जोर लावा. या पक्षाचे तिकीट आणले तर तुम्ही शंभर टक्के विधानसभा निवडणूक जिंकाल.
राजकीय स्थिती पाहता निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. ही संधी साधून की काय. इच्छुक उमेदवारांकडे ज्योतिष, मांत्रिकांचे फोन यायला लागले आहेत. मी राज्यातील बडे आणि त्याचे घरचे सर्व पूजा विधी, धार्मिक विधी, तांत्रिक विधी करतो.
माझ्यामुळे अमुक-अमुक मंत्री झाला. आमच्या तांत्रिक विद्याने फायदा होतो, आमचे थेट हिमालयामध्ये संपर्क आहेत आणि त्यासाठी हिमालयतच जावे लागते. तिथली लोकं फोनवर बोलत नाही. यासाठी कमीत कमी सहा आकडे एवढा खर्च येईल. पण, तुमचे काम शंभर टक्के होणार. विधीची रक्कम ऐकून इच्छुक उमेदवार त्या मांत्रिकाला सांगतात थोडं थांब बाबा. त्यानंतर अमुक पक्षाचा एक जुना कार्यकर्ता येतो तो सांगतो की माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत.
तुमचा बायोडाटा या नेत्याकडे मी दिला. पक्ष प्रमुखाशी माझे चांगले संबंध आहेत. राज्यातील बड्या नेत्याच्या पत्नीला सांगून तुमचे तिकीटाचे काम फायनल करतो. तुम्हीच विधानसभेत जावा, अशी माझी फार प्रामाणिक इच्छा आहे. सध्या ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, अशी अवस्था इच्छुक उमेदवाराची झाली आहे, तिकीटाचा पत्ता नाही आणि सल्ले देण्यासाठी शेकडो जण अशी अवस्था झालेली असली तरी सर्वांचे ऐकून घेण्याशिवाय इच्छुकांपुढे पर्याय नाही.





