Pune : रक्तरंजित बदल्याचा हल्ला टळला; पोलिसांच्या धडक कारवाईत एक संशयित अटकेत

पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा रक्तरंजित हल्ल्याची शक्यता निर्माण झाली होती. आंदेकर, सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दुधभाते टोळीतील वैर डोकं वर काढत असतानाच, पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका खुनाचा कट उधळला गेला.
भारती विद्यापीठ पोलिसांनी संशयिताला रंगेहात पकडले असून काही साथीदार फरार आहेत. दत्ता बाळू काळे (रा.डोके तालीम) असे अटक आरोपीचे नाव आहे.
वनराज आंदेकरची १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात निर्घृण हत्या झाली. गेल्या काही दिवसांपासून आंदेकर खुनाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने बदला घेण्याची भाषा सुरू होती. रविवारी मध्यरात्री शस्त्रसाठ्यासह हल्ल्याची तयारी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेा, भारती विद्यापीठ पोलिसांच्या सतर्कतेने टोळीतील एकाला रंगेहात पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर दत्ता काळेला अटक केली. कटाचा सूत्रधार बेपत्ता आहे.
आंदेकर टोळीतील काहींनी भारती विद्यापीठ परिसरात भाड्याने रूम घेतली होती. पकडलेल्या संशयिताने कोणावर नेमका वॉच ठेवला होता, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्याचे आंदेकर टोळीतील काहींशी संपर्क आहे. मोबाइल लोकेशन चेक केल्यावर काही गुन्हेगार या परिसरात असल्याचे आढळले.





