Pune : पोर्शे कार प्रकरणाचा आधार घेत ‘ब्लॅकमेलिंग’

पुणे – राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्याची धमकी देऊन कात्रज भागातील हाॅटेलचालकांकडून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. पोर्श कार अपघात प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आधार घेत आरोपी हॉटेलचालकांना ब्लॅक मेल करत होते.
निखील शिंदे (३०), सिद्धार्थ रणपिसे (वय २८, दोघे रा. समता सोसायटी, सहकारनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिंदे हा स्वत:ला आरटीआय कार्यकर्ता म्हणवतो, तर रणपिसे हा त्याचा भाचा आहे. या प्रकरणी पुणे रेस्टॉरंट अॅण्ड हॉटेलिअरचे उपाध्यक्ष विश्वनाथ पुजारी (५७, रा. अमित अॅस्टोनिया, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुजारी यांचे कात्रज परिसरात हॉटेल आहे. आरोपी शिंदे, रणपिसे या परिसरातील रेस्टोरंट आणि बारचालकांना भेटले. “तुम्ही बेकायदा व्यवसाय करत आहेत. येथे पार्किंग व्यवस्था नाही. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देण्यात येणार आहे,’ अशी धमकी आरोपींनी दिली. पुजारी यांच्यासह कात्रज भागातील हाॅटेल, बारचालकांना धमकावून त्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.
खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुजारी यांच्यासह अन्य हाॅटेलचालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुजारी यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या शिंदे आणि रणपिसे यांना पोलिसांनी सापळा लावून पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.
२५ बारची यादी देत प्रत्येकी दोन लाखाची मागणी
फिर्यादी विश्वनाथ पुजारी यांनी सांगितले, की “आरोपी निखील शिंदे हा नमस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून कात्रज परिसरात काम करतो. त्याने २०२० मध्येही एका हॉटेल चालकाकडे चार लाखांची खंडणी मागितली होती. तर दीड वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांकडे बार चालकांची तक्रार केली होती. पोर्श कारच्या प्रकरणानंतर जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती भागातील बारवर कारवाईचा बडगा उगारला होता.
ही बाब लक्षात घेऊन तो आम्हाला ब्लॅकमेल करायला लागला. त्याने माझ्याकडे कात्रज परिसरातील २५ बारची यादी सोपवली. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख जमा करण्यास सांगितले. तसे न केल्यास प्रशासनाकडे तक्रार करुन हॉटेल बंद पाडेल तसेच जीवे मारेल, अशी धमकी दिली होती. यानंतर आम्ही पोलीस उपायुक्त आणि खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. पथकाने सापळा रचून लष्कर परिसरात दोघांना अटक केली.’





