Pune : बिलांची कामे तत्काळ मार्गी लागणार

पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कामांमध्ये होणारा विलंब आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी एकाच डॅशबोर्डवर आधारित संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. यामुळे बिलांची थांबलेली कामे तत्काळ मार्गी लागतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही एक विशेष डॅशबोर्ड तयार केल्याने कर्मचारी निवृत्त झाल्याच्या दिवशीच त्यांना सर्व रक्कम मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते शिवस्वराज्य गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली. त्यानंतर पवार यांनी जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेतला, या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत स्तरावरही डिजिटल क्रांती घडवत आता कर भरण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे- मुंबईसारख्या महानगरांत बसूनही गावाकडील घरांचा कर भरता येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेतील विविध विभागांची माहिती आता व्हॉट्सॲप चॅटबॉक्सवर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना घरबसल्या माहिती मिळेल. अंगणवाडी सेविकांसाठीही एक ॲप तयार केले असून, त्याचा फायदा लाडक्या बहिणींना होईल, असे पवार म्हणाले.





