Pune : पालखी सजावटीत माऊली, तुकोबांची वैष्ट्यिपूर्ण प्रतिमा

महादेव जाधव
कोंढवा – आषाढी वारी निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे देहू येथून आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीतून पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पुष्प सजावटींनी सजविलेल्या पालखी रथावरील संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आकर्षक प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहेत. या प्रतिमांतून पालखी सोहळा दूरवरूनही लक्षात येताच भाविक नतसम्तक होत आहेत.
आषाढी वारीतील पुष्प सजावट रथांसाठी गेल्या वर्षीपासून संतांच्या प्रतिमा (पेंटिंग कटआउट) पालखी रथावर मध्यभागी लावले जात आहे. हडपसर येथील चित्रकार व शिल्पकार विशाल केदारी हे दोन्ही संतांच्या पालखीसाठी या प्रतिमा गेल्यावर्षीपासून साकारत आहेत. याबाबत प्रभातशी बोलताना विशाल केदारी म्हणाले की, वॉटरप्रूफ प्लायवूडवर ऍक्रेलिक व ऑइल कलरमध्ये संतांच्या पेंटिंग साकारतो आहे.
यावर्षीही रथाच्या शिरोभागी मधोमध लावण्यासाठी माऊलींचा चांदीचा हुबेहूब मुखवटा चित्ररूपात रेखाटला आहे. सासवड ते जेजुरी दरम्यान सजविण्यात येणाऱ्या पुष्प सजावटीसाठी विठ्ठल रखुमाईची प्रतिमाही साकारली आहे.
‘पालखी सोहळ्यात मिळेल ती सेवा करून पुण्य मिळावे ही भावना प्रत्येकाची असते. लाखो वारकऱ्यांचे दैवत असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज व माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाच्या पुष्प सजावटीत फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपली सेवा रूजू करावी या उद्देशाने ही चित्र साकारली. आपण रेखाटलेल्या पेंटिंगचे लाखो वारकरी दर्शन घेतात, ही पांडुरंगाची कृपा आहे. माझ्यातील कला वैष्णवांसाठी अर्पण आहे.’ – विशाल केदारी, चित्रकार, हडपसर





