Pune : मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीतच

पुणे : राज्यातील विविध खासगी विद्यापीठे केंद्र सरकारच्या शासन निर्णयानंतरही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा फायदा दिला जात नसून महाराष्ट्र सरकारच्या सहायक आयुक्तांकडून या बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या विरोधात दि. ८ एप्रिलला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
युवक काँग्रेसचे सचिव ॲड. सुमेध गायकवाड यांनी सांगितले की. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महाराष्ट्र शासनाने दि. ७ जूलै २०२३ मध्ये शासन निर्णय काढला होता. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या अभिमत विद्यापीठे, व्होकेशनल संस्था, राज्य शासनाची मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि इतर सर्व खासगी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे बंधनकारक आहे.
केंद्र शासनाने दिलेल्या तंबीनंतर शासनाने या योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, खासगी महाविद्यालयाला शिकणाऱ्या एकाही विद्यार्थ्याला त्याचा फायदा मिळालेला नाही. त्यासाठी सदर खासगी विद्यापीठांची भूमिका आणि समाज कल्याण विभागातील सहायक आयुक्तांची उदासिनता, असे दोन्ही घटक कारणीभूत आहेत, महाराष्ट्र सरकारने दोन्हींवर योग्यती कार्यवाही करीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.





