pune : तीन लाखांत बी. कॉम. ची पदवी?

अधिकाऱ्यांविरोधात तक्रार; पुणे विद्यापीठात बनावट पदवीचे रॅकेट?
Pune: पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने एका रिक्षाचालकाच्या मुलाला परीक्षा न देताच चक्क तीन लाख रुपयांत बनावट बी. कॉम.ची पदवी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणामुळे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्रे (फेक पदवी) विकणारे रॅकेट असल्याचे उघड झाले असून, गंभीर तक्रार करूनही विद्यापीठ प्रशासन संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.
वित्त व लेखा विभागातील सहाय्यक कक्षाधिकारी पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने एका रिक्षाचालकाच्या मुलाला परीक्षा न देताच बी.कॉम.ची पदवी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी दीड लाख रुपये देण्याचे नक्की झाले.
रिक्षाचालकाने ७० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात अधिकाऱ्याच्या खात्यावर वर्गही केले. मात्र, विद्यापीठाच्या नामविस्तारानंतरही विद्यार्थ्याला जुन्याच पुणे विद्यापीठ नावाची संशयास्पद पदवी हातात टेकवण्यात आली.
शंका आल्याने रिक्षाचालकाने अधिक तपास केला असता, एकाच विद्यार्थ्याच्या नावाने तब्बल चार वेगवेगळ्या वर्षांची बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रिक्षाचालकाने थेट विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार नोंदवून या प्रकाराचा पर्दाफाश केला. याप्रकरणी सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात असून, तक्रार दाखल होऊनही कुलगुरू आणि वरिष्ठ प्रशासन दोषी अधिकाऱ्यावर थेट कारवाई का करत नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
माझ्या मुलाला बी. कॉम.च्या पहिल्या दोन वर्षांचे मार्कलिस्ट देऊन तीन लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ७० हजार रुपये दिलेही. मात्र, मार्कलिस्टमध्ये गडबड दिसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी कुलगुरूंकडे दाद मागितली.
– महेश कदम
तक्रारदार पालक व रिक्षाचालक
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल पुढील दोन दिवसांत प्राप्त होणे अपेक्षित असून, अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
– डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव





