Pune: सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली

पुणे – पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सहायक महापालिका आयुक्त निलंबित करण्यात आले; तर परिमंडळ तीनच्या उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश शनिवारी जारी केले आहेत.
संदीप खलाटे असे निलंबित केलेल्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांचे नाव आहे. तर परिमंडळ तीनचे उपायुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. खलाटे यांची खातेनिहाय चौकशी लावण्यात आली असून, ती चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे परंतु त्यांना नवी नियुक्ती देण्यात आली नाही.
दि. २५ जुलै रोजी सिंहगड रोड येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करणेसाठी समक्ष भेट दिली. त्यावेळी खलाटे यांनी केलेल्या कामामध्ये कर्तव्यपरायणता दिसून आली नाही. तसेच त्यांनी कामाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसून, ही अशोभनीय गोष्ट केलेली आहे, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच कर्तव्य पार पाडताना खलाटे यांनी गुणवत्ता, औचित्य आणि उत्तरदायित्व ठेवले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
यास्तव खलाटे यांना अटी शर्तीनुसार मनपा सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. खलाटे यांची खातेनिहाय चौकशी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या परिमंडळ तीनच्या उपायुक्तांनी करावी. तोपर्यंत खलाटे यांना पुणे महापालिका हद्दीचे कार्यक्षेत्र सोडता येणार नाही, त्यांना नियमानुसार निर्वाहभत्ता द्यावा, याची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत करण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
अन्य अनुपस्थित अधिकाऱ्यांचे काय?
पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागात रात्रीची ड्युटी ज्या उपायुक्तांची होती. त्यांच्याही कामाची चौकशी करणार का?, त्यांचे काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. जूनमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर आयुक्तांनी आदेश काढून उपायुक्तांना रात्रीची ड्युटी करण्याचे आदेश दिले होते.





