PUNE: असरच्या अहवालाचा असाही परिणाम…

पुणे – प्रथम या संस्थेने असर २०२३ हा सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला होता. त्यात शाळकरी विद्यार्थ्यांना साधी गणितीय समीकरणे आणि वाचन अशा मुलभूत संकल्पनाही येत नसल्याचे समोर आले होते. डोळ्यांत अंजन घालणाऱ्या या रिपोर्टमुळे शिक्षण विभागच पुरता हादरला आहे. आता ही चिंताजनक स्थिती सुधारण्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणा सुधारण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख त्यांच्या क्षेत्रातील शाळांना सातत्याने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि अचानक भेटी देणार आहेत. कोणत्याही इयत्तेतील विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी जाणून घेण्यासाठी त्यांनी चाचणी घ्यावी लागणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले आहे याची तपासणी करावी लागणार आहे. तपासणीचा अहवाल असमाधानकारक असल्यास संबंधित शिक्षकाला अधिकच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याची शिफारस त्यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याकडे करावी.
शिक्षणाधिकाऱ्यानी शिफारस प्राप्त झाल्यास संबंधित शिक्षकास अधिकच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे पाठवावे लागणार आहे. शिक्षकाने अतिरिक्त प्रशिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत फारशी वाढ झाली नसल्याचे आढळल्यास शिक्षणाधिकाऱ्याने तसा अहवाल शिक्षण संचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांना सादर करावा लागणार आहे. याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याकडे असेल.
असे केले होते सर्वेक्षण…
देशातील २६ राज्यांत २८ जिल्ह्यांतील १४ ते १८ वयोगटात ३४ हजार ७४५ युवक-विद्यार्थी यांचा अभ्सास करण्यात आला होता. महारष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील ६० गावांत १ हजार ३७४ युवकांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये कृती कौशल्य, मूलभूत क्षमता तसेच डिजिटल साक्षरता व कौशल्य हे प्रमुख निकष निर्धारित करण्यात आले होते. यापैकी कृती कौशल्य वगळता इतर कौशल्ये निराशाजनक आढळली. हे सर्वेक्षण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित होते. पण, त्यातून राज्यभरातील स्थितीचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.





