पुणे : दहा महिन्यांत तब्बल 11 बळी!

नवले पुलावरील अपघात थांबणार तरी कधी?
पुणे – पश्चिम बाह्यवळण मार्गावरील नवले पुलावर होणारे अपघात नेहमीचेच झाले आहेत. मागच्या दहा महिन्यांत या परिसरात विविध अपघातांत तब्बल 11 जणांना जीव गमवावा लागला. 12 जण गंभीर जखमी, 18 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
दरी पूल – नवले पूल आणि वडगाव पूल या साडेतीन किलोमीटर अंतरात हे अपघात होतात. मुंबई-बंगळुरू महामार्ग हा पुण्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते.
या मार्गाने मोठ्या प्रमाणात मालाची ने-आण मुंबईला केली जाते. मात्र, ही वाहने नवले पूल परिसरात आली असता, अपघाताला बळी पडतात. मागच्या वर्षी नवले पूल भागात अपघातांत 13 लोकांना जीव गमवावा लागला होता. तर 15 जण गंभीर जखमी झाले होते. तर 27 जण किरकोळ जखमी झाले होते.
अपघातांची कारणे काय?
* कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत तीव्र उतार असल्याने वेगाने वाहने येतात.
* या ठिकाणी तीव्र वळणदेखील आहे. तेथे वाहनांना अचानक ब्रेक लावणे कठीण जाते.
* काही ठिकाणी सेवा रस्ते नाहीत. यामुळे स्थानिक वाहनचालकांना महामार्गवरून जावे लागते.
* अवजड वाहनांचे चालक इंधन वाचवण्यासाठी उतारावरून वाहने “न्यूट्रल’ करत असल्याने वाहनांवरील ताबा सुटतो.





