Pune : निवडणूक बंदोबस्तासाठी जिल्ह्यात सशस्त्र दल

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि कर्नाटक पोलिसांचे सशस्त्र दल सज्ज असणार आहे. त्यापैकी सहा कंपन्या (पलटन) दाखलही झाल्या आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो. यामध्ये बारामती मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही मतदारसंघ ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आहेत. तर, शिरूरमधील हडपसर आणि भोसरी वगळता उर्वरित चार विधानसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभेतील फक्त मावळ विधानसभा क्षेत्राचा भाग पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
बारामतीचे मतदान दि. ७ मे, तर शिरूर आणि मावळचे मतदान दि. १३ मे या दिवळी होणार आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यासह निवडणूक कामासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची जबाबदारी ग्रामीण पोलिसांवर आहे.
बंदोबस्तासाठी ग्रामीण पोलिसांच्या मनुष्यबळासह सीआयएसएफ आणि कर्नाटक पोलिसांच्या आठ कंपन्या जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असणार आहेत. ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारितील तीन लोकसभा मतदारसंघांपैकी मावळमधील केवळ २१७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे पोलिसांना प्रामुख्याने बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतच लक्ष केद्रीत करावे लागणार आहे.
संवेदनशील केंद्रांवर चोख बंदोबस्त
बारामती लोकसभा मतदारसंघात सहा मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्यापैकी मुळशी येथे दोन आणि इंदापूर येथे एक मतदान केंद्र आहे. तर, शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव येथे एक केंद्र संवेदनशील आहे. मावळ लोकसभेत आठ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मात्र, त्यापैकी केवळ एक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आहेत. या ठिकाणी आवश्यकतेनुसार अधिकचा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.
ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारितील मतदान केंद्र संख्या
बारामती – १८०५
शिरूर – ११३७
मावळ – २१७




