Pune : अरिजितच्या सुरांनी धडधडणार रसिकांचे काळीज

पुणे : भावपूर्ण सुरांचा बादशहा आणि समस्त तरुण- तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग पुन्हा एकदा पुणे शहरात सादरीकरण करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, हे सादरीकरण आजपर्यंचे सर्वांत भव्य असणार आहे. या कार्यक्रमासाठी तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक संगीतप्रेमींची उपस्थिती असणार आहे. म्हाळुंगे येथील एमसीएच्या स्टेडियममध्ये अरिजितच्या गायकीची जादू अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
यानिमित्ताने अपना बना ले, तुम क्या मिले, केसरिया किंवा कोणतेही आवडते हिट सुपरहिट गाणे अनुभवण्यासाठी संगीतप्रेमींना ही चांगली संधी असणार आहे. हा कार्यक्रम हेरंब शेळके ग्रुपने आयोजित केला असून, याचे सहप्रायोजक ‘तुबोर्ग’ असणार आहेत. हा कार्यक्रम ‘टु बीएचके’च्या वतीने आयोजित केला असून, ही संगीत मेजवानी १६ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमाची तिकीटे www.district.in या वेबसाइटवर बुक करता येणार आहेत.
पुण्यात अरिजित सिंहच्या कॉन्सर्टला नेहमीच तुफान गर्दी होते. कॉन्सर्टची तारीख जाहीर होताच प्रेक्षक तिकीट खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. एकदा तर तिकिटांची विक्री भरपूर प्रमाणात झाल्याने कॉन्सर्ट पुढे ढकलून स्थळही बदलावे लागले होते. आता अरिजितच्या आवाजाने पुन्हा पुणेकरांचे काळीज धडधडणार आहे. अरिजित सिंग हा सध्याच्या तरुणांचा आवडता गायक असून त्याचे लाइव्ह गाणं ऐकणे अनेकांचे स्वप्न असतं.
अनेक तरुण सध्या अरिजित सिंगचीच गाणी गुणगुणताना दिसतात. प्रायोजकांनी तिकिटे अवघ्या ५९९९ रुपयांपासून उपलब्ध करून दिली असल्यामुळे प्रेक्षकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी पुरेशा पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.




