Pune : डी.एस.के मधील गुंतवणूकदारांना कागदपत्रातील दुरुस्तीचे आवाहन

पुणे : नामवंत बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची यादी तयार केली असून त्यातील बी आणि सी यादीत त्रुटी आढळल्या आहेत. यादी न्यायालयात सादर करण्यापूर्वी त्यात दुरस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी गुंतवणूकदारांनी ठराविक तारखेला शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हजर राहवे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या ए यादीत डी. एस. के यांच्या कार्यालयातून प्राप्त झालेल्या ठेवीदारांची यादी आहे. बी यादीत गुंतवणुकीची माहिती व कागदपत्रे सादर केलेल्या ठेवीदारांची यादी आहे. सी यादीमध्ये शॉर्ट टर्म लोन धारकांची यादी आहे. यादीमध्ये खालील त्रुटी आढळलेल्या आहेत. ठेवीच्या पावत्या, बँक खात्याचा कॅन्सल चेक, आधारकार्ड नसणे, ठेव रक्कमेची चुकीची नोंद, मोबाईल नंबर, बैंक खाते क्रमांक आदी त्रुटी आढळल्या आहेत. काही कंपनीच्या पत्त्यामध्येही विसंगती दिसून येते. यामुळे गुंतवणूकादरांनी २९ आणि ३० मे रोजी मूळ कागद पत्रे आणि फोटो कॉपी घेऊन कार्यालयात हजर राहवे.
ज्यांचे नाव वरील दोन यादीत नाही आणि ठेवीदार यादीमध्ये आहे, त्यांनी २ ते ७ या काळात कागदपत्रे दाखल करावीत. डीएसकेडीएल ही पब्लिक लिमिटेड कंपनी असल्याने तेथे गुंतवणूक केलेल्यांची नावे एनसीएलटी कोर्टात पाठविण्यात आली असल्याने त्यांची माहिती स्विकारली जाणार नाही. मुदत ठेवीदाराचे निधन झाले असल्यास वारसांनी नोंद असलेले कागदपत्र, मृत्यू दाखला, कुटुंबातील इतर सदस्यचे संमती पत्र, मयताचे आधार कार्ड आणि सर्व वारसदारांचे फोटो द्यावेत.
ज्यांची माहिती अचूक आहे आणि पूर्ण कागदपत्रे जमा आहेत, त्यांनी परत यायची गरज नाही. ज्यांच्या कागदपत्रात त्रुटी आहेत किंवा कागदपत्रे जमा करून यादीमध्ये नावे आलेले नाही, अशाच लोकांनी येण्याची गरज आहे. ए यादीच्या आधारा बी आणि सी यादीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्त यादी २० जून २०२५ नंतर न्यायालयात सादर केली जाणार आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी सहापर्यंत कागदपत्रे स्विकारली जातील.





