Pune : जीबीएसचा आणखी एक रुग्ण दगावला

पुणे : गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) बाधित आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे मृतांची संख्या सहा झाली आहे. गेल्या २४ तासात नव्याने जीबीएस बाधित तीन रुग्ण सापडले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे.
मागील पंधरा दिवसांपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात दूषित पाणी आणि अन्न सेवनामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखीच्या समस्यांमुळे जीबीएस रुग्णसंख्या वाढली. मात्र, मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असून, गुरूवारी (दि. ६) दहा रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आत्तापर्यंत ७२ रुग्ण बरे झाले आहेत.
जीबीएस रुग्णांची सर्वाधिक संख्या धायरी, नांदेडगाव, सिंहगडरस्ता, किरकटवाडी, खडकवासला या भागात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातही रुग्ण सापडले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. बाधितांमध्ये ३४ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या (८७) ही समाविष्ट गावातील आहे. २२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २२ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत.
गेल्या २४ तासात जीबीएसने खासगी रुग्णालयातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या सहावर पोहचली असून, त्यापैकी एक रुग्ण जीबीएसमुळे, तर अन्य पाच रूग्ण जीबीएस संशयीत मृत्यू झाला असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दाखल रुग्णांपैकी ५५ रूग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत असून, २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
जीबीएसची स्थिती
वय – एकूण रुग्णसंख्या
० ते ९ – २३
१० ते १९ – २३
२० ते २९ – ३८
३० ते ३९ – २१
४० ते ४९ – २२
५० ते ५९ – २५
६० ते ६९- १५
७० ते ७९ – २
८० ते ८९ – ४





