पुणे : ५ वी व ८ वी साठी वार्षिक, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सन २०२३-२४ पासूनच ही कार्यपद्धती लागू करण्यात येत आहे. ५ वीसाठी ५० तर ८ वीसाठी ६० गुणांची वार्षिक परीक्षा होणार आहे. नापास होणारे विद्यार्थी त्याच ठेवले जाणार आहेत. याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ हा १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यातील कलम १६ मध्ये कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही, असे नमूद केलेले आहे.
केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १६ मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे. त्यानुसार, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा होणार आहे.
बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नसल्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले, तर त्याला इयत्ता ५ वी च्या वर्गात किंवा इयत्ता ८ वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे.





