Pune : सेवाज्येष्ठता डावलून कनिष्ठांना पदे दिल्याप्रकरणाची होणार चौकशी; पणन संचालकांनी घेतली दखल

पुणे : पुणे बाजार समितीमध्ये सेवाज्येष्ठता डावलून कनिष्ठांना डावलून महत्त्वाची पदे दिल्याची बाब उघडकीस आली होती. याबाबतचे वृत्त दैनिक ‘प्रभात’ने २० मे रोजी प्रसिद्ध केले होते. याची राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार आहे. त्यामुळे बाजार समितीचे संचालक मंडळ व शासकीय प्रतिनिधी असलेले सचिव अडचणीत येण्याची शक्यता आहे.
फळे व भाजीपाला विभाग, फूल विभाग, भुसार विभाग, मांजरी उपबाजार, तसेच मोशी उपबाजार हे पुणे बाजार समितीचे ५ महत्त्वाचे विभाग आहेत. याठिकाणी विभाग प्रमुखांची नेमणूक झाली आहे. सेवाज्येष्ठतच्या यादीत यातील अधिकाऱ्यांची नावे शोधल्यास लवकर सापडत नसून, ही नावे खालून शोधावी लागत आहेत. नेमणूक झालेले काही अधिकारी तर कनिष्ठ लिपिक आहेत.
नियुक्ती करताना बाजार समितीने सेवाज्येष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केलीच नाही. केवळ बाजार शुल्कामध्ये वाढ केल्याने बदलीद्वारे या पदावर नियुक्ती केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठ असलेले कर्मचारी नाराज होते. कर्तृत्व असतानाही दाखवता येत नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र, त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. न्याय मिळण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या कारभाराची पणन संचालक चौकशी करणार आहेत.




