Pune : लाचखोरीप्रकरणी एक अभियंता निलंबित

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन लाचखोर वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याला जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. अन्य दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निलंबनाबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरीष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तीनही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले होते. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारदार व्यक्तीकडे लाचेची मागणी केली होती.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार (वय ५७ वर्षे), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५७ वर्षे) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश होता. यापैकी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांना निलंबित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. त्यानुसार त्यांनी बगाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. बाबुराव पवार आणि उपअभियंता दत्तात्रेय पवार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, सरकारी सेवेतील तरतुदीनुसार कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी २४ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यास, संबंधिताचे निलंबन करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतील तीनही लाचखोर अधिकारी हे दोन दिवसांहून अधिक काळ पोलीस व न्यायालयीन कोठडीत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.





