पुणे : ‘बोगदा’ प्रकल्पासाठी “टीडीआर’चा पर्याय

खडकवासला धरण ते फुरसुंगी भूमिगत वाहिनीबाबत अजित पवार यांची माहिती
पुणे – शहरातून वाहणाऱ्या कालव्याची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी आणि त्याचा हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) द्यावेत. “टीडीआर’च्या रकमेतून हा प्रकल्प पूर्णत्वाला जाईल, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
खडकवासला धरण ते फुरसुंगी असा शहरातून वाहणारा कालवा रद्द करून त्याऐवजी बोगदा करण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प झाल्यास सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागाकडे नाही. त्यामुळे रक्कम उभी करण्यासाठी पर्यायांची चाचपणी केली जात आहे.
पवार म्हणाले, “खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत बोगदा प्रकल्पाबाबत सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत बैठक घेतली. हा प्रकल्प महसूल, नगरविकास, नगररचना आणि जलसंपदा या विभागांशी संबंधित आहे. हा कालवा शहरातून वाहतो, कालव्याच्या आजुबाजूला महापालिकेचे रस्ते आहेत.
त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या कालव्याची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी आणि त्याबदल्यात टीडीआर देण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर विचारविनिमय करण्यात येणार आहे. या पर्यायासोबतच इतर पर्यायांची चाचपणी करावी, जेणेकरून हा प्रकल्प मार्गी लागेल, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.’





