Pune : टार्गेट पूर्ण केल्यास एसटी चालक, वाहकाला भत्ता

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला उद्दीष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्यांना एसटीच्या चालक आणि वाहकांना महामंडळाकडून (एसटी) प्रत्येकी १० टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. या योजनेचा स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारातून आत्तापर्यंत २०० चालक-वाहक यांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे एसटीच्या उत्पन्न वाढीसह चालक-वाहक यांनाही फायदा होत आहे.
खासगी वाहतुकदाराला टक्कर देण्यासाठी तसेच एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक आणि वाहकांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न एसटी प्रशासन करीत आहे. त्यासाठी एसटीने आजपर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. चालक व वाहकाला प्रोत्साहन भत्ता दिल्यास ते एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास महामंडळाला असल्याने त्यांना प्रोत्साहन भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गावर धावणाऱ्या बसचे उत्पन्न वाढविण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार चालक आणि वाहकांना रोख स्वरुपात कमिशन देण्यात येते. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढत असून त्याचा दोघांनाही फायदा होत आहे.
एसटी महामंडळाकडून ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. दि. ३१ जानेवारीपर्यंत ही योजना असून जे चालक-वाहक उद्दिष्टापेक्षा जास्त रक्कम आणतात त्यांना रोख स्वरुपात प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. आत्तापर्यंत २०० कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
– प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे
स्वारगेट आगार पुढे…
पुण्यातून राज्य आणि राज्याबाहेर प्रवासी सेवा दिली जाते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या बसची संख्या जास्त आहे. स्वारगेट विभागातून दि. १ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत १४० आणि शिवाजीनगर आगारातून ६० चालक-वाहकांनी प्रोत्साहन भत्याचा लाभ घेतला आहे. दिवसेंदिवस प्रोत्साहन भत्ता घेणाऱ्यांची संख्या वाढत असून त्याचा एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांना फायदा होत आहे.





