Pune : तिन्ही पक्ष मिळून अंतिम निर्णय घेतील

पुणे : सध्या प्रत्येक पक्ष सत्ता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या प्रत्यक्ष निवडणूक येईल, त्या वेळी महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे निवडणुकीविषयी आताच घाई करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.
जिल्हा परिषद येथे शिव स्वराज्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, की सर्व पक्षांना सर्व जागांवर लढण्याचा अधिकार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी महायुतीतील तीनही प्रमुख एकत्र बसून निर्णय घेतील. रामदास आठवले व इतर सहकाऱ्यांनाही सोबत घेण्यात येईल. प्रत्येक पक्षाला संघटना वाढविण्याचा अधिकार आहे.
मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये बोलावे
कोणताही मंत्री किंवा लोकप्रतिनिधींनी आपले मत सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करण्याऐवजी कॅबिनेट बैठकीत किंवा पक्षाच्या व्यासपीठावर मांडावे. अन्य ठिकाणी बोलल्याने गैरसमज निर्माण होतात. आम्ही एकोप्याने कारभार करत आहोत. भांड्याला भांडं लागत असेल, तर त्यातून मार्ग काढू; पण कारण नसताना गैरसमज निर्माण करू नये, असेही पवार म्हणाले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांची बैठक घेतली आहे. यंदा जवळपास १५ लाख विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी १३ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ऑनलाइन पद्धतीमुळे ग्रामीण भागात अडचणी येत आहेत. याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी बोलण झाले असून, पालक आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची हमी शासन देईल, असे पवार म्हणाले.





