Pune : एअर इंडियाकडून पुण्यातील ५ उड्डाणे रद्द

पुणे– एअर इंडियाने अरुंद आकाराच्या विमानाची उड्डाणे ५ टक्क्यांनी घटविण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फटका पुण्याला बसणार आहे. वरील निर्णयामुळे पुण्यातील पाच उड्डाणे कमी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर कंपनीने त्यांच्या सेवेत मोठी घट केली आहे. पुण्यातून सिंगापूरला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानांच्या संपूर्ण ताफ्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यानंतर एअर इंडियाने बोइंग ७८७ विमानांची सर्व उड्डाण रद्द केली होती. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या विमानांच्या उड्डाणात एअर इंडियाने १५ टक्क्यांनी घट केली होती.
ही घट जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत लागू राहणार आहे. त्यातच कंपनीने अरुंद आकाराच्या विमानांची उड्डाणेदेखील ५ टक्क्यांनी घटविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील बहुतांश उड्डाणे देशांतर्गत प्रवासासाठी आहेत. या निर्णयाचा परिणाम पुण्यालाही भोगावा लागणार आहे.
एअर इंडियाच्या या निर्णयामळे पुणे ते सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाली आहे. दिल्ली ते पुणे या देशांतर्गत विमानसेवेची वारंवारिता घटवण्यात आली आहे. या निर्णयाआधी दिल्ली-पुणे विमानमार्गावर आठवड्याला ५९ उड्डाणे होत होती, ती आता घटून ५४ वर येणार आहेत. हे दोन्ही बदल किमान १५ जुलैपर्यंत लागू राहणार आहेत. या काळात तिकीट काढलेल्या सर्व प्रवाशांना पर्यायी व्यवस्था एअर इंडिया उपलब्ध करून देईल किंवा तिकिटाचे सर्व पैसे परत केले जातील.





