पुणे : लोणी काळभोर येथे होणार अपर तहसील कार्यालय

हवेली तहसीलचे विभाजन
पुणे – शहरीकरण वेगाने होत असलेल्या हवेली तालुक्याचे महसुली विभाजन करण्यास शासनाने गुरुवारी मान्यता दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर येथे आणखी एक अपर तहसील कार्यालय स्थापन होणार आहे. शासनदरबारी 2015 पासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. आज अखेर या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हवेली तालुक्यातील नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे.
हवेली तालुक्यात कामाचा व्याप वाढत असल्याने प्रलंबित कामांची संख्या मोठी आहे. कामे वेळेत आणि वेगाने होण्यासाठी पूर्व आणि पश्चिम हवेली असे दोन तालुके निर्माण करायचे अथवा हवेली तालुक्यात दोन अपर तहसीलदार नेमायचे, असा प्रस्ताव 2015 मध्ये शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्यावर निर्णय होत नव्हता.

दरम्यान, हवेली तहसिलचे विभाजन दोन-तीन महिन्यांत करण्यात येणार असल्याची घोषणा डिसेंबर 2022 मध्ये महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. अखेर 11 महिन्यांनी महसुलमंत्र्यांच्या घोषणेवर शिक्कामोर्तब झाले आहे. पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात हवेली तालुक्याचा विस्तार आहे.
तालुक्यातील काही गावांचा समावेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये होतो. चारही बाजूंनी तालुक्याचा विस्तार वेगाने होत आहे. तालुक्याची लोकसंख्या सुमारे 28 लाख आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणावर असल्याने उद्योग, व्यवसाय वेगाने वाढत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तालुक्यात महसूल विभागावर कामाचा व्याप वाढत आहे.





