pune : भेसळयुक्त दूध, अस्वच्छ दुग्ध उद्योगांवर कारवाई
Pune:

अन्न व औषध प्रशासनाकडून १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे – अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात २५ ते २७ जून दरम्यान दुग्ध प्रक्रिया उद्योगांवर धडक कारवाई करण्यात आली. पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील विविध आस्थापनांची तपासणी करून एकूण १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला. तर अनेक आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
शिरूर तालुक्यातील मे. गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे तपासणीदरम्यान स्टोरेज टँकमधील व पॅकेज्ड दुधाचे नमुने अधिकृत विश्लेषणासाठी घेण्यात आले. प्राथमिक अल्कोहोल चाचणीत दूध संशयास्पद आढळल्याने १२,२७८ लिटर दूध (किंमत ५.२८ लाख रुपये) तातडीने नष्ट करण्यात आले. दुधाची अम्लता कमी करण्यासाठी कॉस्टिक सोडाचा वापर केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
आंबेगाव तालुक्यातील उमिया मिल्क प्रॉडक्ट येथे अत्यंत अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे आढळून १ हजार १५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम (किंमत १.४८ लाख रुपये) जप्त करण्यात आले. तसेच, सोलापूर येथील रामदेव डेअरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन होत असल्याने ६.९१ लाख रुपयांचा १ हजार ८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट केला.
माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रात अस्वच्छ परिस्थितीत प्रक्रिया सुरू असल्याने ८० लिटर दूध नष्ट करून परवाना निलंबित करण्यात आला.
दरम्यान, अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, हॉटेल तपासणी मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली असून, ताथवडे येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊसमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचाही अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दुग्ध उत्पादक, वितरक, विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले असून, ग्राहकांनीही अन्नपदार्थ खरेदीपूर्वी लेबल, उत्पादन दिनांक, एफएसएसएआय परवाना आणि पॅकेजिंगची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.





