Pune : विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाई थंडावली

खडकवासला – पुणे जिल्हा तसेच शहरात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. करोना अद्यापही पूर्णत: गेलेला नाही तसेच लसीकरणाचा वेगही मंदावला आहे, अशा स्थितीत करोनाचे तीन नियम म्हणजेच मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर प्रत्येकाने पाळणे गरजेचेच आहे; परंतु याकडे शहर तसेच उपनगरीय भागातील नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. विनामास्क असलेल्यांवरील दंडात्मक कारवाईही थंडावली आहे.
उपनगरांतील नागरिकांमध्ये मास्क वापरण्याबाबत अनेकजण उदासीन दिसून येत असल्याने करोना तसेच ओमायक्रॉनबाबत भीती वर्तविली जात आहे; परंतु अनेक ठिकाणी रुग्णसंख्या कमी झालेली असल्याने नागरिक गर्दीतही विनामास्क फिरत आहेत. हॅन्ड वॉश, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. करोनाची भीती संपली असल्याचे चित्र उपनगरांत निर्माण झाले आहे.
करोनाचा अन्य देशांतील स्थिती पाहता याचा उद्रेक आपल्याकडेही होऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात असताना महापालिका प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.





