Pune: अनधिकृत शाळांवर कारवाई अटळ; शिक्षण विभागाचे आदेश

पुणे – शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांवर कारवाई अटळ आहे. मात्र, शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीमधील काही शाळा या गतवर्षीच्या यादीतील असल्याने पुन्हा पडताळणी देखील होणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या अनधिकृत शाळांचीही शहानिशा केली जाणार आहे.
पुण्यालगत असलेल्या हवेली आणि मुळशी तालुक्यात सर्वाधिक अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. त्यामध्ये शाळांनी पालकांना सोईस्कर शाळा ठरावी म्हणून गावातील प्रमुख चौकात शाळा सुरू असल्याचे सांगितले आहे. परंतु, प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर ती दुसर्या ठिकाणीच असल्याचे लक्षात येत आहे.
तर, काही शाळा या व्यावसायिक इमारतीमध्ये सुरू असून ज्याठिकाणी मुलांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवण्यास शाळा असमर्थ आहेत. तर, काही शाळांना परवानगी ही चौथीपर्यंत असताना देखील पुढील वर्ग चालविले जात आहेत. तर काही शाळांना कनिष्ठ वर्गांना परवानगी नाही तरी चौथीपर्यंत वर्ग चालवले जात आहेत.
दरम्यान, शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये काही शाळा या पूर्वीच्याच अनधिकृत शाळांच्या यादीमधील आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या अनधिकृत शाळांवर कारवाईच झाली किंवा नाही, असाही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. तर, शाळा बंद झाली असेल तर यादीमध्ये नाव समाविष्ट कसे झाले हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग या शाळांवर पुढे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यास वेळ लागला असला तरी, कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. अनधिकृत शाळांबाबत शिक्षण विभागाला योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.” – संतोष पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी.





